मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या २८८ जागांसाठी आज राज्यभर मतदान सुरू आहे. यादरम्यान एक अजब-गजब घटना समोर आलीय. मतदानासाठी आलेल्या एका मतदात्याला निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानापासून रोखलं. यामागे त्यांनी दिलेलं कारण ऐकून या मतदात्यालाही धक्काच बसला. 'निवडणूक यादीनुसार, तुम्ही मृत दर्शवत आहात त्यामुळे तुम्हाला मतदानाचा अधिकारी नाही' असं समजल्यानंतर काय बोलावं हेच या मतदात्याला समजलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विनोद कुमार मोदी आणि त्यांची पत्नी मंजुला मोदा मुंबईतल्या वांद्रे भागातील माऊंट मेरी भागात राहतात. गेल्या ३५ वर्षांपासून ते याच मतदारसंघात मतदान करतात. परंतु, आज जेव्हा मंजुला आणि त्यांचे पती विनोद मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहचले तेव्हा मंजुला यांना मत देण्याचा अधिकार नसल्याचं सांगण्यात आलं. त्या आता ह्यात नाहीत त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नाही, असं कारण त्यांना देण्यात आलं. 


मंजुला यांना हे कारण ऐकून धक्काच बसला. कारण १५ दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नवीन मतदान ओळखपत्र बनवून घेतलं होतं. धक्कादायक म्हणजे, यापूर्वी मुंबईत २९ एप्रिल २०१९ रोजी मुंबईत झालेल्या मतदानातही मंजुला यांना मृत घोषित करण्यात आल्यानं मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं. 


राज्यात २८८ जागांसाठी सुरु असलेल्या मतदानासाठी निवडणूक आयोगानं ९,६६,६६१ मतदान केंद्र उभारलेत. राज्यात मतदानासाठी एकूण १,३५,०२१ व्हीव्हीपॅट मशीन वापरात येत आहेत.