सचिन वाझेंचा पाठलाग करणारी गाडी ATSची, वाझेंच्या हालचालींवर नजर
सचिन वाझे यांनी दोन गाड्या आपल्याला फॉलो करत असल्याचा केला होता आरोप
मुंबई : सचिन वाजे आज पुन्हा मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला आले होते. मला दोन गाड्या फॉलो करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. पण या गाड्या एटीएसच्या असल्याचं समोर आलं आहे. ATSच्या टीमकडून वाझेंचा पाठलाग होत आहे. पोलीस मुख्यालयाबाहेरील गाडी ATSचीच होती. सचिन वाझेंच्या हालचालींवर ATSची नजर असल्याचं दिसत आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे थोड्याच वेळात त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. वाट पाहा, थोड्याच वेळात सगळी उत्तरं देतो, असं वाझे म्हणाले होते. वाझे यांना क्राईम ब्रांचमधून हटवल्याचं गृहमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे. मात्र वाझेंची बदली नको, निलंबनच हवं, यावर विरोधक ठाम आहेत.
मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली होती. त्यानंतर एटीएसला देखील त्यांच्या हत्येचा संशय आहे. एटीएस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पण या सगळ्यांमध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव देखील आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधक वाझेंवर कारवाईची मागणी करत आहेत.
एटीएसच्या टीमनं मनसुख यांच्या बँक अकाउंटची चौकशी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. TJSB आणि ICICI बँकेत मनसुख यांचं खातं आहे. या बँकेतून एटीएसच्या टीमनं काही कागदपत्र आणल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय हिरेन कुटुंबाकडून अधिक माहिती घेण्याचं कामही सुरु आहे.
मनसुखची हिरेन यांच्या गाडी संदर्भात ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे लागल्याचं देखील कळतं आहे. विक्रोळी पोलीस स्टेशन येथे मनसुख हिरेन यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. गाडी चोरी संदर्भाची कागदपत्रे घेवून ATS चे अधिकारी ठाणे ATS कार्यालयात दाखल झाले होते. पुरवणी FIR केली जाणार असल्याची ATS सुत्रांची माहिती आहे. मुख्य FIR मध्ये अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज FIR मध्ये आरोपींची नावे समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे.