मुंबई : सीडीआर प्रकरणी आएशा श्रॉफचं नाव समोर आलंय. तिनं साहिल खानचे सीडीआर रिझवान सिद्दीकीला दिल्याचा संशय आहे. नेमकं काय आहे हे आएशा, साहिल आणि सीडीआर प्रकरण? बॉलिवूडला लव्ह, सेक्स, धोका हे मुळीच नवं नाही. पण मग एकदा का प्रेमावरचा विश्वास उडाला, की सुरू होतं एकमेकांवर पाळत ठेवणं, त्याची उणी दुणी काढणं. नातं संपवणं. असंच काहीसं आएशा श्रॉफ आणि अभिनेता साहिल खान यांच्यात घडल्याचं सांगण्यात येतंय. तशी ही रिलेशनशिप समोर आलीही नसती. पण सीडीआरप्रकरणी ठाणे पोलिसांनी वकील रिझवान सिद्दीकीची चौकशी केली... तेव्हा त्याच्या लॅपटॉपमधून अनेक नावं समोर आली. त्यातलंच एक नाव आएशा श्रॉफ.


आएशा श्रॉफ अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आएशा श्रॉफ ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता जॅकी श्रॉफची पत्नी. तर साहिल खान हा दोन चार सिनेमांमध्ये अभिनय केलेला अभिनेता. दोघांनी मिळून 2009 मध्ये एक कंपनी सुरू केली. या कंपनीच्या व्यवहारांत साहिल खाननं 8 कोटींची फसवणूक केल्याचा आएशाचा आरोप आहे. तर माझे आणि आएशाचे प्रेमसंबंध होते. यातले बहुतांश पैसे आएशावरच आणि तिला दिलेल्या भेटवस्तूंवरच खर्च केल्याचा दावा साहिल खाननं केलाय. तर साहिल खान हा गे आहे, त्याच्याबरोबर कुठलेही प्रेमसंबंध शक्य नाहीत, असं आएशाचं म्हणणं आहे. 


दोघेही वेगवेगळ्या स्तरांवर भांडत राहिले


याच दरम्यान आएशानं साहिलचे CDR अर्थात फोन रेकॉर्डस कुठून तरी मिळवले आणि वकील रिझवान सिद्दीकीला दिले. 2009 ते 2015 अशी सात वर्षं हे दोघेही वेगवेगळ्या स्तरांवर भांडत राहिले आणि 2015 मध्ये मात्र दोघांनीही एकमेकांविरोधातले खटले मागे घेतले. व्यवसायामध्ये जो तोटा झाला, त्याबद्दल साहिल खाननं आएशाची लेखी माफी मागितली, त्यानंतर आएशानं साहिलविरोधातले सगले खटले मागे घेतले. दोघांनी सुरू केलेली कंपनी अखेर बंद झाली... एकमेकांविरोधात माध्यमांमधून कुठलेही आरोप करायचे नाहीत, असंही दोघांचं ठरलं.


यापुढे ढवळाढवळ करायची नाही


तसंच एकमेकांच्या आयुष्यात यापुढे ढवळाढवळ करायची नाही, असंही दोघांनी ठरवलं. आणि झालं गेलं दोघंही विसरुन गेले. पण आता रिझवान सिद्दीकीच्या लॅपटॉ़पमध्ये सीडीआर प्रकरणी आएशाचं नाव सापडलं आणि हे सगळं प्रकरण पुन्हा बाहेर आलं. आता उत्सुकता आहे ती आएशानं साहिलचे सीडीआर रेकॉर्डस कुठून मिळवले याची.