Babasaheb Ambedkar यांच्या 131 व्या जयंतीची जय्यत तयारी; अनुयायांमध्ये मोठा उत्साह
Babasaheb Ambedkar Jayanti 2022:: भारतीय संविधानाचे निर्माते आणि माणसाला माणसासारखं जगायचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे.
मुंबई : Babasaheb Ambedkar Jayanti 2022:: भारतीय संविधानाचे निर्माते आणि माणसाला माणसासारखं जगायचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131 वी जयंती आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज मुंबईत चैत्यभूमीवर तसंच नागपुरात दिक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोरोनामुळे गेले 2 वर्ष बाबासाहेबांची जयंती साजरी करता आली नव्हती. मात्र आता निर्बंध उठल्यामुळे राज्यात धुमधडाक्यात बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी परिसरात दर्शनासाठी दरवर्षी लाखो भीम अनुयायांची गर्दी होते. त्यासाठी चैत्यभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.
लातूरमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 70 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क याठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आहे. फायबर, प्लास्टिक आणि प्लास्टर याचा वापर करून तयार करण्यात आलेला हा राज्यातला पहिलाच पुतळा आहे. 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज' या नावाने हा पुतळा तयार करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये 2 हजार 51 वह्यांनी सिम्बॉल ऑफ नॉलेज साकारण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती आणि बासरीवाला आधुनिक ढोल ताशा पथक यांनी महामानवाला ही आगळी वेगळी मानवंदना दिली आहे. महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालया शेजारी 660 चौरस फूटाच्या जागेवर बाबासाहेबांची ही प्रतिकृती आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये आगळी आदरांजली अर्पण करण्यात आलीये. 31 हजार चौरस फुटांमध्ये गव्हाच्या शेतीमधून त्यांचं सुंदर पोर्टेट साकारण्यात आलंय. बाळासाहेब म्हस्के यांच्या संकल्पनेतून उद्देश पघळ यांनी ही कलाकृती साकारलीये. यासाठी त्यांना 20 दिवस लागले.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा,आमदार रवी राणा यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काल रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसंच, त्यांना अभिवादन करत सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.