चंद्रशेखर भुयार, झी 24 तास, बदलापूर: मुंबईसह उपनगरातील लाखो प्रवासी दररोज रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी महत्वाचे बदल करण्यात येतात. बदलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर स्थानकावर प्लॅटफॉर्म वाढविण्यात आले आहेत. दरम्यान प्रवाशांचा गोंधळ उडू नये म्हणून लोकल डब्यांची जागा बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नव्याने सुरु झालेल्या या नियमामुळे प्रवाशांची मात्र चांगलची कसरत होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूर रेल्वे स्थानकात वाढीव प्लॅटफॉर्ममुळे लोकलच्या डब्यांची जागा बदलली आहे. त्यामुळे रोजच्या डब्यात चढतांना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान हे रोजचे झाले असतांना लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवासी करत आहेत.


बदलापुर स्थानकात सध्या होम प्लॅटफॉर्मचे काम आणि कर्जत दिशेकडील नवीन पादचारी पुलामुळे प्लॅटफॉर्म 1 आणि 2 ची लांबी ही कर्जत दिशेकडे वाढवण्यात आली आहे.त्यामुळे रोजचा लोकल डब्बा हा पुढे सरकत असल्याने प्रवाशांचा गोंधळ होतोय.रेल्वे कडून या संबंधी उद्घोषणा होते मात्र अनेक प्रवाशांना हा मनस्ताप होत आहे.


हे आता प्रवाशांना रोजचे झाले आहे. मात्र प्रत्यक्षात लोकल वाढवण्याच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नसल्याने प्रवासी नाराज आहेत. दिवसाला लाखो प्रवासी बदलापुर स्थानकातुन प्रवास करतात. रेल्वेला त्यामुळे मोठे उत्पन्न मिळते,असे असूनदेखील लोकलची संख्या कमी असल्याने सकाळपासून पुढे गर्दीत प्रवास करावा लागतो. 


दोन लोकल स्थानकावर येण्यामधील अंतर हे अर्धा ते पाऊण तासाचे आहे. अशावेळी एका लोकलला चढता आले नाही तर दुसऱ्या लोकलसाठी ताटकळत बसावे लागते. त्यामुळे या मागणी कडे रेल्वे प्रशासन कधी लक्ष देणार? असा सवाल प्रवासी करत आहेत.