Aaditya Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी हजारो नागरिक आज बदलापूरमध्ये रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे. आदित्य ठाकरेंनी देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेबरोबरच बदलापूर प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 


सुरक्षेची जबाबदारी महिलांवर का असावी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"दररोज आम्ही महिलांसाठी "सेल्फ डिफेन्स क्लासेस" सुरू करण्याचा विचार करतो, खरं तर असं आम्ही यापूर्वी केले होते. मात्र मनातील एक खोल आवाज मला विचारतो पण का? आम्ही लवकरच क्लास सुरू करणार असलो तरी, दुर्दैवाने असे क्लास सुरु करणे काळाची गरज आहे, तरीही प्रश्न उरतोच की असं का? सुरक्षेची जबाबदारी महिलांवर का असावी? समाज आणि कायदा महिलांच्या सुरक्षिततेची खात्री का देऊ शकत नाही?" असे प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले आहेत. 


बलात्कारासारखा अपराध...


"आपल्याला देशभरातून रोज विनयभंग, बलात्काराच्या घटनांबद्दल ऐकायला मिळतं त्यामुळे आपला संताप होतो. जलद न्यायालयात खटला चालवावा, निष्पक्ष न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी हीच आमची अपेक्षा आहे. मानवतेविरुद्धचा गुन्हा म्हणता येईल असा बलात्कारासारखा अपराध सहन करता येणार नाही," असंही आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका मांडताना स्पष्ट केलं. 


वय हा मुद्दा नाहीच...


"आज बदलापूर प्रकरणाबद्दल ऐकून मन हेलावून गेलं. पुन्हा एकदा हेच सांगू इच्छितो की वयोगट वेगळा आहे हा काही फरकाचा मुद्दा असू शकत नाही. बलात्कार हा बलात्कार असतो. आम्हाला न्याय हवा आहे, आम्हाला कठोर शिक्षेची उदाहरणे हवी आहेत ज्यामुळे या बलात्काऱ्यांच्या मनात भीती निर्माण होईल," असं आदित्य ठाकरे म्हणाले. 


नक्की वाचा >> Badlapur School Case: 3 वर्षांची चिमुकली पालकांना म्हणाली, 'दादाने माझ्या...'; 'त्या' शाळेत नेमकं काय घडलं?


बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखी...


"महाराष्ट्राबाबत मी पुन्हा एकदा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना विनंती करतो की, महाराष्ट्र शक्ती विधेयकाला प्रदीर्घ प्रलंबित संमती द्यावी. यामुळे महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसंदर्भातील कायद्याचे सक्षमीकरण होईल. मी हे आधीही बोललो होतो आणि पुन्हा सांगतो, बलात्काऱ्याला दहशतवाद्यासारखी वागणूक द्या!" असं आदित्य यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.



एसआयटीची स्थापना


"बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएल अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत," अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या अधिकृत एक्स हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. 



दगडफेक, लाठीचार्ज


दरम्यान, बदलापूरमधील नागरिक रेल्वे मार्गावर उतरले असून तीन तासांहून अधिक काळापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक झाल्याची माहितीही समोर येत असून जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केल्याचे समजते.