Balasaheb Thackeray Oil Painting: बाळासाहेबांवरील डॉक्युमेंट्रीत मोदींचा Video अन् शिंदेंचा फोटो
Balasaheb Thackeray Oil Painting Documentary: विधानभवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जीवनप्रवास दाखवणारी डॉक्युमेंट्री दाखवली गेली.
Balasaheb Thackeray Oil Painting: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये तैलचित्राचं अनावरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबरोबरच केंद्रीय मंत्री नारायण राणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंबरोबरच अनेक आजी-माजी आमदार, खासदार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमासाठी बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) या हजेरी लावली नाही. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाळासाहेबांच्या आयुष्यावरील एक डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली. या डॉक्युमेंट्रीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो होता. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडीओही दाखवण्यात आला.
शिंदेंचा फोटो
पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बाळासाहेबांचं तैलचित्र विधानसभेच्या सभागृहात लावण्याची मागणी केली. ही मागणी नार्वेकरांनी मान्य केली, असा उल्लेख या डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आला. यावेळी बाळासाहेबांनी शिवसेना सुरु करण्यापासूनचा प्रवास चित्र आणि भाषणांच्या क्लिपच्या माध्यमातून दाखवण्यात आला. यावेळी बाळासाहेबांनी सहकारी जोडले असा उल्लेख आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंचा फोटो दाखवण्यात आला. त्याचप्रमाणे 1996 च्या शिवसेना-भाजपा युतीच्या सरकाराचाही उल्लेख या डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आला.
मोदींचं भाषण
याच डॉक्युमेंट्रीमध्ये बाळासाहेबांच्या भूमिकांचा उल्लेख करताना काश्मीरच्या मुद्द्याचा समावेश दिसून आला. बाळासाहेबांची काश्मीरसंदर्भातील भूमिका स्पष्टच होती, असं सांगतानाच पंतप्रधान मोदींचं जुनं भाषण दाखवण्यात आलं. या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी काश्मीरसंदर्भातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होणार असं सांगितलं होतं. बाळासाहेबांच्या जुन्या भाषणांच्या व्हिडीओ क्लिप्सही या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवण्यात आल्या. या क्लिपमध्ये हायकमांडबद्दल तुम्ही का बोलत नाही हे बाळासाहेबांचं वाक्य आवर्जून दाखवण्यात आलं. मात्र यामध्ये बाळासाहेबांचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो किंवा उल्लेखही नव्हता.
कोण कोण होतं उपस्थित?
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबरोबरच केंद्रीय अल्प आणि लघु उद्योगमंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांसहीत इतर मान्यवर तैलचित्राचं अनावरण करण्यासाठी उपस्थित होते. शिंदे सरकारमधील मंत्री दिपक केसरकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना दिली. यामध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी बाळासाहेबांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
अजित पवरांनी केली विनंती
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना पोटात एक आणि ओठावर एक असं बाळासाहेबांचं कधीच नव्हतं, असं म्हटलं. बाळासाहेबांचा उल्लेख केवळ हिंदूहृदयसम्राट असा न करता शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट असा करावा, अशी विनंती अजित पवारांनी केली.