शेतमालाला हमीभाव दिला नाही तर व्यापाऱ्यांवर राज्य सरकार चालवणार खटला
राज्यभरात या कायद्यांविरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आली
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आणि शेतमालाला हमी भाव दिला नाही तर संबंधित व्यापाऱ्यांविरुद्ध खटला चालवण्याची तरतुद असलेला कायदा करण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. यासाठी लवकरच मंत्रीमंडळाची समिती स्थापन केली जाणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.
केंद्रातील भाजपा सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने राज्यभर सह्यांची मोहीम राबवली होती. या मोहीम अंतर्गत ६० लाखहून अधिक सह्या राज्यभरातून गोळा करण्यात आल्या आहेत. कृषी कायदे रद्द करण्याच्या निवेदनासह या सह्या अखिल भारतीय काँग्रेसकडे पाठवल्या जाणार आहेत. यासाठी प्रदेश काँग्रेसने या सह्यांची निवेदने पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे सुपुर्द केली.
काँग्रेस देशभरातून अशा २ कोटी सह्या जमा करून राष्ट्रपतींकडे पाठवणार आहे. केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असल्याचा काँग्रेसचा दावा असून राज्यभरात या कायद्यांविरोधात काँग्रेसने आंदोलनही केले होते.