सनातनवर बंदी : केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव!
सनातन संस्थेवरील बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्याचं पुढे आले आहे.
मुंबई : सनातन संस्थेवरील बंदीबाबत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये कमालीचा समन्वयाचा अभाव असल्याचं पुढे आले आहे. सनातनवरील बंदीबाबत राज्य सरकारकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी स्पष्ट केले आहे. तर राज्य सरकारनं बंदीबाबत केंद्राला प्रस्ताव पाठवल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. त्यानंतर केंद्रानं यासंदर्भात हात झटकले आहेत.
राष्ट्रवादीची टीका
नालासोपारा येथून सनातन संस्थेचा साधक वैभव राऊत याला महाराष्ट्र एटीएस पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या घरी बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्यही सापडले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेय. घातपात करण्याच्या कारवाईत सनातन संस्थेचा हात आहे. मात्र, त्यांना राज्य सरकारचा राजाश्रय मिळत आहे. या लोकांना किती जणांचा जीव घ्यायचा आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय. दरम्यान, सनातन संस्थेन वैभव हा आमचा नाही. मात्र, त्याल मदत हवी असेल तर ती आम्ही करु असे सांगत त्याला पाठिंबा दिलाय. महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा येथून वैभव राऊतला अटक केली. त्याच्या घरात बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्यही सापडले आहे. यावरुन सनातन संस्था दहशतवादी कारवाई करत आहे हे स्पष्ट होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
काँग्रेसकडून कारवाईची मागणी
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) छापे टाकून सनातन संस्थेच्या साधकांना शस्त्रास्त्रांसह ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, असे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.
'एएनआय' वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, एटीएसने टाकलेल्या छाप्यांमध्ये २० बॉम्ब आणि स्फोटकांसाठी लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले. यामागे खूप मोठा कट असून या माध्यमातून ध्रुवीकरण आणि धर्मनिरपेक्षतेवर घाला घातला जात आहे. या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी केलेल्या कारवाईत तीन हिंदुत्ववादी अतेरिक्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून काही स्फोटके आणि ती तयार करण्याची सामग्री जप्त करण्यात आली होती.