मुंबई : तुमची बँकेची कामं असतील तर ती गुरुवारपर्यंत उरका विकेंडपर्यंत थांबू नका. कारण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपामुळे शुक्रवारपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत ग्राहकांना बँकेची कामं उरकावी लागतील. १ फेब्रुवारी रोजी पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे, मात्र बँक कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. त्यामुळे शुक्रवार ते रविवार असे सलग तीन दिवस बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. 


३१ जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला देशव्यापी संप आहे. २ फेब्रुवारीला रविवार असल्याने सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. पगारवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे.