मुंबई : तुमचे दोन डोस होऊन 14 दिवस झाले असतील तर नक्कीच आता तुम्ही लोकलने प्रवास करू शकता. मात्र जर आज तुम्ही ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. लोकल प्रवास करण्यापूर्वी रविवारी कुठे मेगाब्लॉक आहे, (Sunday Megablock) हे जाणून घ्या. त्यामुळे तुमचा वेळ आणि त्रास वाचण्यास मदत होईल. मध्य रेल्वेवर आज म्हणजेच रविवार 26 रोजी हा मेगाब्लॉग (Megablock) घेण्यात येणार आहे.


हार्बर मार्गावर ब्लॉक  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वेने रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक परिचालीत करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी  11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10  पर्यंत मेगाब्लॉग असणार आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे/गोरेगावसाठी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.


पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.  


तसंच ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक दरम्यान सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. मेन लाईन वर दिवा आणि ठाणे दरम्यान अप धिम्या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी 10 तासांचा विशेष ब्लॉक आधीच जाहीर करण्यात आलेला आहे.


पश्चिम मार्गावर या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक


ट्रॅक सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी, पश्चिम रेल्वे रविवार, 26 सप्टेंबर, 2021 रोजी सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर 10.35 ते 15.35 पर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक असणार आहे. सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येईल.


परिणामी, ब्लॉक कालावधीतील सर्व उपनगरीय सेवा विलेपार्ले स्टेशनच्या जलद कॉरिडॉरवरील प्लॅटफॉर्म क्र. 5/6 वर वळवण्यात येतील. डबल थांबा दिला जाईल आणि जलद मार्गावर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे गाड्या राम मंदिर स्टेशनवर थांबणार नाहीत, असंही कळवण्यात आलं आहे.