नवी मुंबई : हार्बर मार्गावरील बेलापूर ते खारकोपर या रेल्वे मार्गावर रुळाखालील माती खचल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. रेल्वेनं तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. बेलापूर जवळील शहाबाज गावाजवळ ही घटना घडली आहे. लोकल ट्रेन जात असताना एका नागरिकानं यासंदर्भात व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक थांबवून काम हाती घेण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई आणि उपनगरात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आज रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सायन आणि माटुंगा स्थानकाच्या दरम्यान पाणी साचल्याने वाहतुक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहतूक बंद असणार आहे. 


मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. नालासोपारा- वसई रुळांवर पाणी साचल्याने अनिश्चित काळासाठी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. वसईत कालपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीसोबत पश्चिम रेल्वेलाही बसला आहे. विरार नालासोपारा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं असल्यानं विरारहून चर्चगेट दिशेने जाणाऱ्या लोकल अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.


वसईत आतापर्यंत ३०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. "रेल्वे सुविधा बँद असल्याने हजारो प्रवाशी रेल्वे स्थानकात ताटकळत होते. तर काहींनी पून्हा घरचा रस्ता धरला. पुढील सूचना येईपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून सेवा बंद राहणार असल्याची माहिती लाऊडस्पीकरच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना देण्यात येत आहे.