बेस्ट बेकरी प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका; 14 जणांना दिले होते पेटवून
Gujarat Best Bakery Case : बेस्ट बेकरी प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने मंगळवारी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गुजरातमध्ये, गोध्रा दंगलीनंतर झालेल्या हिंसाचारानंतर बेस्ट बेकरीला आग लावण्यात आली होती. या घटनेत 14 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Gujarat Best Bakery Case : बेस्ट बेकरी प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने (Mumbai Court) मंगळवारी हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. गुजरातमध्ये, (Gujarat) गोध्रा दंगलीनंतर झालेल्या हिंसाचारानंतर बेस्ट बेकरीच्या घटनेत 14 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी सोलंकी आणि गोहिल हे दोघेही गेली 10 वर्षे मुंबई कारागृहात बंद होते. दोघांनाही सोडून देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
असा होता घटनाक्रम
याप्रकरणी इतरांविरुद्ध न्यायालयात खटला सुरू असताना सोलंकी व गोहिल फरार झाले होते. त्यांच्यावर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर या दोघांना 2013 मध्ये मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले होते. 2019 मध्ये त्यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला. गुजरात पोलिसांनी 21 जणांवर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. 2003 मध्ये वडोदरा कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. 2004 मध्ये सुप्रीम कोर्टाने निष्पक्ष न्यायासाठी गुजरातबाहेर मुंबईत या खटल्याची पुन्हा सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते.
2006 मध्ये, मुंबई न्यायालयाने नऊ जणांना हत्येप्रकरणी दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 2012 मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने नऊपैकी पाच जणांची निर्दोष मुक्तता केली, तर उर्वरित चार जणांची शिक्षा कायम ठेवली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने चार प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा पुरावा ग्राह्य धरला. दुसरीकडे सोलंकी आणि गोहिल यांच्यावर वडोदरा न्यायालयात खटला सुरू असताना, मुंबईतल्या सुनावणीदरम्यान त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. त्यांच्या अटकेनंतर सोलंकी आणि गोहिल यांना 2013 मध्ये मुंबई न्यायालयात हजर करण्यात आले. 2018 मध्ये, न्यायालयाने पुरावे असल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. 2019 मध्ये, मुंबई न्यायालयाने त्याच्यावर खुनाचे आरोप निश्चित केले आणि खटला सुरू झाला. त्यानंतर आता दोघांचीही कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
काय असे बेस्ट बेकरी प्रकरण?
2002 मध्ये गोध्रा दंगलीनंतर वडोदरा येथील हनुमान टेकरी भागात असलेल्या बेस्ट बेकरीला जमावाने आग लावली होती. या घटनेत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी बेस्ट बेकरीच्या मालकाची मुलगी जाहिरा शेख हिने 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. संतप्त जमावाने बेकरी चालवणाऱ्या शेख कुटुंबासह आत राहणाऱ्या मुस्लिमांना लक्ष्य केले. दंगलीच्या वेळी ठार झालेल्या चौदा जणांनी बेस्ट बेकरीमध्ये आश्रय घेतला होता. बेकरीमध्ये काम करणाऱ्या तीन हिंदू कामगारांचीही हत्या करण्यात आली होती.