मुंबई: प्रशासनासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारीही बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप कायम राहणार आहे. मात्र, शिवसेनेच्या कामगार सेनेने या संपातून आज माघार घेतली. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून शिवसेना कामगार सेनेचे ११ हजार कर्मचारी कामावर रुजू होतील. तर बेस्ट कृती समिती अजूनही संपाच्या निर्णयावर ठाम आहे. मात्र, शिवसेनेचे कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांमुळे बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात ५०० ते ७०० बस रस्त्यावर उतरतील. त्यामुळे आजच्या तुलनेत उद्या प्रवाशांना कमी त्रासाला सामोरे जावे लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, बेस्ट कामगारांनी मंगळवारी संप पाळला. बहुतांश कामगार संपाच्या बाजूने ठाम होते. मात्र, सत्ताधारी असल्याने शिवसेनेची संघटना संपात सहभागी झाली नाही. मात्र, त्यांनी या संपाला नैतिक पाठिंबा दिला. गेल्यावर्षी कामगारांनी पुकारलेला संप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कामगारांनी मागे घेतला होता. 


आजच्या संपामुळे बेस्टच्या जवळपास ३ हजार ३०० बस या मुंबईच्या रस्त्यावर धावल्या नाहीत. दररोज २७ ते ३० लाख प्रवासी बेस्टच्या बसने प्रवास करतात. आधीच तोट्यात असलेल्या बेस्ट प्रशासनाला या संपामुळे आर्थिक फटका बसणार आहे. बेस्ट प्रशासनाला त्यांच्या प्रवासी सेवेतून प्रतिदिन २ कोटी ७० लाख ते ३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे निश्चितच आजच्या संपाचा आर्थिक फटका बेस्ट प्रशासनाला बसणार आहे.