मुंबई : भारतातील शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिलीय. याला राज्यातील विविध संघटनांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. यामध्ये एपीएमसी मार्केट देखील सहभागी होणार असून भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे. सोबतत माथाडी कामगार देखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान भारत बंदमध्ये बेस्ट बसेस सहभागी होणार नाहीत. बेस्ट प्रशासनाने याबद्दल माहिती दिली. तसेच टॅक्सी देखील रस्त्यावर नियमित धावतील असे टॅक्सी युनियनने स्पष्ट केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



बेस्ट बसेस उद्या रस्त्यांवर धावतील. त्या भारत बंदचा भाग नसतील असे बृहन्मुंबई वीज आणि वाहतूक विभागाने सांगितले. बसेच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात येणार आहेत. बसच्या खिडक्यांवर लोखंडी जाळ्या आणि इतर सुरक्षेची काळजी घेण्यात येईल असेही बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलंय. 



नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत अनेकदा बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता ९ डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. शेतकरी संघटना कायदा रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण केंद्र सरकार कायदा रद्द करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 



शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या 'भारत बंद'ला आतापर्यंत अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यातच विरोधी पक्ष देखील यातून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीने या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.


बच्चू कडुंचे आवाहन 


7/12 वाचवायचा असेल तर 8/12 महत्त्वाचा आहे तसेच जात-पात, धर्म, प्रांत हे न पाहता सर्वांनी भारत बंदमध्ये सहभागी होऊन भारत बंदला यशस्वी करण्याचे आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलं. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मागील तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या दिशेने कूच केली असून त्यांचा मोटारसायकल मोर्चा आज मध्यप्रदेशच्या भोपाळ वरून वरून रवाना होणार आहे. बच्चू कडू यांचा आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे.


एपीएमसी बंद


एपीएमसी दाणा मार्केट आणि मसाला मार्केट बंद राहणार का याबाबत उद्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. एपीएमसी संचालक शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एपीएमसीतील तीन मार्केट राहणार बंद राहणार आहेत. शेतकरी कायद्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली होती. त्यामुळे आता एपीएमसीदेखील बंद राहणार आहे.