मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे सोमवारी निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज वांद्रे कलानगर येथे जाऊन रश्मी ठाकरे आणि पाटणकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'वैयक्तिक दु:ख बाजूला सारुन बैठक घेतली, उद्धवजींचा धीरोदत्तपणा प्रशंसनीय'


माधव पाटणकर यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीचे होते. माधव पाटणकर आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते.माधव पाटणकर यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी ठाकरे कुटुंबीयांचे फोनवरुन सांत्वन केले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. 


माधव पाटणकर यांचे निधन झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमधील सोमवारची नियोजित बैठक होऊ शकली नाही. ही बैठक आज होण्याची शक्यता होती. मात्र, आजही भेट टळली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नाराज काँग्रेस नेत्यांची समजूत कधी काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते सध्या उद्धव ठाकरे यांचा निरोप कधी येईल, याची प्रतिक्षा करत आहेत. तत्पूर्वी आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून काँग्रेस नेत्यांना टोले लगावण्यात आले. काँग्रेस नेत्यांकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे महाविकासआघाडीच्या भवितव्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.