जिंकण्यासाठी जिद्दीने लढणारा `योद्धा` विजू पेणकर यांच्या `खेळचरित्रा`चं प्रकाशन
भारत श्री आणि कबड्डीपटू विजू पेणकर यांचा खेळासाठीचा संघर्ष या पुस्तकात मांडण्यात आला आहे
मुंबई : 'योद्धा' हे भारत श्री आणि कबड्डीपटू विजू पेणकर यांचं खेळचरित्र संघर्ष करणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी दीपस्तंभाचे काम करेल, खेळातील त्यांचे कर्तृत्व स्फूर्तिदायक आहे. प्रत्येक खेळाडूपर्यंत हे खेळचरित्र पोहचले पाहिजे असे गौरवोद्गार राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण लिखित योद्धा या खेळचरित्राचं उद्घाटन मुंबईत एका शानदार समारंभात झाले त्यावेळी ते बोलत होते.
माझगावच्या सर एली कदुरी शाळेतील प्रांगणात हा सोहळा रंगला. या सोहळ्यास व्यायाममहर्षी मधुकर तळवलकर, आमदार रवींद्र वायकर, आमदार शशिकांत शिंदे, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, इंडियन ज्युईश फेडरेशनचे अध्यक्ष जोनाथन सॉलोमन, प्रकाशक प्रज्ञा जांभेकर, आयोजक राल्फ पेणकर तसंच अनेक अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू उपस्थित होते.
विजू पेणकरांसारख्या कबड्डीतील अनेक दिग्गज खेळाडूंच्या आठवणी दृष्यमाध्यामात जतन केल्यास येणार्या पिढीस त्या मार्गदर्शक ठरतील. कबड्डी संघटनेने यासाठी पुढाकार घ्यावा या लेखक संदीप चव्हाण यांच्या मागणीची दखल घेत याचा पाठपुरावा सरकारी पातळीवर आपण नक्की करू असं आश्वासन यावेळी धनंजय मुंडे यांनी दिलं. पेणकर खरे योद्धा आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होतेय हे मी माझे भाग्य समजतो असेही ते म्हणाले.
आपल्या प्रत्येकाचा रोज जगण्यासाठी संघर्ष असतो. या संघर्षात जिथे तुमची हिंमत संपेल असे वाटेल त्या प्रत्येक अवघड वळणावर योद्धा हे पुस्तक तुम्हाला दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल असे विजू पेणकर म्हणाले.
या पुस्तकासाठी पन्नास वर्षापूर्वी घडलेल्या घटनांची माहिती आणि फोटो संकलित करणे अवघड होते. तब्बल दोन वर्ष त्यासाठी मेहनत घेतली. गरिबीचे चटके सोसून, अनेक संकटांचा मुकाबला करत यश मिळवणाऱ्या पेणकरांचे हे खेळ चरित्र अनेकांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास संदीप चव्हाण यांनी व्यक्त केला.
विजू सारखा शिष्य लाभणे हा मी माझा गौरव समजतो अशा शब्दात मधुकर तळवलकर यांनी विजू पेणकर यांचा गौरव केला.
विजू पेणकर यांचा संघर्ष मी जवळून पाहिलाय. जिद्दीनं तो नेहमी जिंकण्यासाठीच लढला. पेणकर यांची क्रीडा कारकिर्द प्रेरणादायी आहे असे आमदार रविंद्र वायकर यांनी सांगितले.
ज्या शाळेत मी शिकलो त्याच शाळेचे विद्यार्थी आणि आमचे रोल मॉडेल असणारे विजू पेणकर यांच्या खेळ चरित्राच्या पुस्तक प्रकाशनास मी उपस्थित आहे हे मी माझे भाग्य समजतो असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले.
भारतातील ज्यू समाजाला राष्ट्रीय पातळीवर विजू पेणकर यांनी आपल्या खेळाने गौरवास्पद उंची गाठून दिली त्याबद्दल ज्यू समाज सदैव त्यांचा ऋणी राहील असे भारतीय ज्युईश संघटनेचे अध्यक्ष सॉलिसीटर जोनाथन सोलोमन यांनी यावेळी म्हटले. सदामंगल प्रकाशनाने आजवर अनेक पुरस्कार प्राप्त पुस्तकांची निर्मिती केलीय. पण योद्धा हे पहिलेच खेळावरील पुस्तक आहे. त्याला चांगाला प्रतिसादा मिळेल अशी आशा प्रकाशक प्रज्ञा जांभेकर यांनी व्यक्त केले. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन लेबाना पेणकर यांनी केलं.