SSC Result 2022 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकालाची तारीख जाहीर
इयत्ता दहावी परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थी पालकांना होती. अखेर विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाची तारीख जाहीर केली. आपण केलेल्या अभ्यासाला फळ मिळणार आहे, यश मिळणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थी आणि पालकांना वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
कुठे पाहाता येतील निकाल
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी 1 नंतर उपलब्ध होतील.
http://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
या अधिकृत साईटवर विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल पाहता येणार आहेत. शिवाय झी 24 तासवर निकालाचे प्रत्येक अपडेट्स पाहाता येणार आहेत.
दहावीला यंदा किती विद्यार्थी?
या परीक्षेस 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 8,89,506 मुलं असून मुलींची संख्या 7,49,458 एवढी आहे. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.