एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एसटी प्रवाशांना मिळणार विषाणूंपासून सुरक्षाकवच
कोरोनामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाचं चाक थांबलं होतं, त्यामुळे महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला आहे
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ आपल्या दहा हजार गाड्यांना अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना विषाणूंपासून सुरक्षा कवच मिळणार आहे. अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग एसटीच्या सर्व श्रेणीतील बसेसमध्ये केलं जाणार आहे. अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग प्रक्रिया बसेसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात करणारी एसटी पहिली वाहतूक संस्था आहे.
कोरोनामुळे राज्यभरातील एसटी महामंडळाचं चाक थांबलं होतं. आता एसटी सुरू असली तरी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने बसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसटी बसमध्ये प्रवासी अनेक ठिकाणी स्पर्श करतात. ज्यामुळे कोरोना व इतर विषाणूंच्या प्रसाराचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी एसटी महामंडळाने बसेसला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एजन्सी निवडीसाठी निविदाही काढण्यात आली आहे. अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग वैज्ञानिकरीत्या सिद्ध झाले आहे की, ते कोरोना व्हायरस, विषाणू, बुरशी आणि इतर जीवाणूपासून संरक्षण देतं.
कुठे करणार कोटिंग?
बसमधील सर्व सीट, हँड रेस्ट, गार्ड रेल, खिडक्या, रेलिंग, ड्रायव्हर केबिन, फ्लोअरिंग, रबर ग्लेझिंग्ज, पॅसेंजर दरवाजा आणि आपत्कालीन दरवाजा बाहेरील व आतील बाजू आणि सामान काक्षाची बाहेरील आणि आतील बाजूवरही अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग केलं जाणार आहे