आताची मोठी बातमी! `ती` कृती भोवली, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल
ठाणे इथे झालेल्या मनसेच्या उत्तरसभेत राज ठाकरे यांनी केलेली `ती` कृती भोवणार
मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांची काल ठाण्यात भव्य सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी तलवार उंचावली होती. याच कारणाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अंतर्गत राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणाचाही तपासणी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाषणात आक्षेपार्ह आढळल्यास याप्रकरणही गुन्हा दाखल होऊ शकते अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.
उत्तरसभेआधी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली तलवार राज ठाकरे यांनी उंचावली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात तलावर उंचावल्याने मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राज ठाकरे यांची वादळी सभा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या सभेत अखेर मशीदीवरील भोंग्याविषयी इशारा दिला आहे. येणाऱ्या 3 तारखेआधी, म्हणजेच ईद आधी मशीदीवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत. तसे न झाल्यास हनुमान चालिसा वाजवली जाईल, हनुमान चालिसाने नाही झालं तर पुढचंही ठरलेलं आहे, माझ्या भात्यातला तो पुढचा बाण अजून मी काढलेला नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
''३ मे राजी ईद आहे, माझी राज्य सरकारला गृह खात्याला विनंती आहे, कोणतीही दंगल कोणतीही तेढ आम्हाला निर्माण करायची नाही, आम्हाला ती इच्छा देखील नाही, महाराष्ट्राचं आम्हाला स्वास्थ बिघडवायचं नाही. पण आज १२ तारीख आहे, १२ ते ३ मे महाराष्ट्रातल्या सर्व मशीदीवरील मौलवींना तुम्ही बोलवून घ्या, त्यांना सांगा, ३ तारखेपर्यंत सर्व मशीदीवरील लाऊडस्पीकर खाली उतरवले गेले पाहिजेत, खाली काढले पाहिजेत, ३ तारखेनंतर आमच्याकडून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.'' पण ३ तारखेनंतर जर भोंगे उतरवले गेले नाहीत, तर तिकडे हनुमान चालिसा वाजवली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.