मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेना गुप्तेश्वर पांडेच्या विरोधात लढणार आहे. यामुळे आता बिहार निवडणुकीत आणखी एक ट्वीस्ट आला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला लागून आलेल्या बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शनमध्ये शिवसेनेची बदनामी करण्यात आली. बिहारचे माजी पोलीस संचालक यांनी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारवर अविश्वास दाखवला होता. दरम्यान बिहारमध्ये गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत सामाना रंगणार आहे. बिहार निवडणुकीत शिवसेना ५० उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुप्तेश्वर पांडे यांनी सेवानिवृत्ती घेत जेडीयूमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पांडेंच्या महाराष्ट्र सरकारविरोधातली भूमिका केवळ आकसापोटी असल्याची शंका शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली. सुशांतसिंग राजपूत प्रकरणात झालेल्या बदनामीनंतर शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली आहे. २०१५ मध्ये शिवसेनेनं ८० जागा लढवत २ लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना ५० जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. 


महाराष्ट्र आणि मुंबई पोलीसांवर ज्या डीजीपी पांडेनी संशय व्यक्त केला गेला होता त्याच पांडेना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झालाय, असं मत शिवसेना खासदार अनिल देसाईंनी व्यक्त केलंय. 


बिहार निवडणुकीचा निर्णय राखून ठेवल्याचे इतके दिवस खासदार संजय राऊत सांगत होते. पण आता देसाईंनी यावरील पडदा हटवला असून शिवसेना बिहार निवडणुकीत पांडे यांच्याविरोधात उतरणार हे स्पष्ट झाले आहे.


दरम्यान बिहार निवडणुकी प्रभारी असणारे देवेंद्र फडणवीस हे गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का ? असा प्रश्न करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल उपस्थित केला होता. 



गुप्तेश्वर पांडेंचे स्पष्टीकरण 


'मागच्या २ महिन्यांमध्ये मला खूप त्रास देण्यात आला. या काळात माझं आयुष्य दयनीय झालं होतं. या काळात मला हजारो फोन आले आणि माझ्या निवृत्तीबद्दल विचारणा झाली. यामुळे मला कंटाळा आला होता,' असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले. 


बिहार पोलिसांना मुंबईमध्ये चुकीची वागणूक देण्यात आली, बिहारच्या अस्मितेसाठी मी लढलो. सुशांत प्रकरणामुळे मी सेवानिवृत्ती घेतोय, असं कोणाला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे. सेवानिवृत्ती घेणं हा माझा संविधानिक अधिकार आहे. मला फक्त सुशांतच्या म्हाताऱ्या वडिलांना मदत करायची होती. सुप्रीम कोर्टानेही बिहार पोलिसांना पाठिंबा दिला, अशी प्रतिक्रिया पांडे यांनी दिली. 


३४ वर्षांच्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी कधीच गुन्हेगारांसोबत तडजोड केली नाही. ५० पेक्षा जास्त एन्काऊंटरमध्ये मी सहभागी झालो होतो. मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही, तसंच याबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. राजकारणात प्रवेश न करताही मी सामाजिक कार्य करु शकतो, असं गुप्तेश्वर पांडे यांनी सांगितलं. 


गुप्तेश्वर पांडे १९८७ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी होते. ३१ जानेवारी २०१९ रोजी गुप्तेश्वर पांडे बिहारचे डीजीपी बनले, ते सुशांत प्रकरणांबद्दल राष्ट्रीय चर्चेत आले. डीजीपी म्हणून गुप्तेश्वर पांडे यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत होता. अलीकडील काळात, ते वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत राहीले. बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधन प्रकरणात ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेसाठी आले होते. सुशांत प्रकरणात रिया चक्रवर्ती यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित केला असता गुप्तेश्वर पांडे यांनीही रिया संदर्भात औकात काढून वाद निर्माण केला.  नंतर, त्यांना यासाठी स्पष्टीकरण द्यावे लागले.


दरम्यान, राज्य सरकारने डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार डीजी संजीव सिंघल, अग्निशमन सेवा आणि होमगार्ड यांना दिला आहे.