भाजप, राष्ट्रवादीचं ठरलं, काँगेसमध्ये अंतर्गत धुसफूस
राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातून राज्यसभेत गेलेले खासदार केंद्रीय मंत्री पियुष गोयल ( Piyush Goyal ), पी. चिदंबरम ( P. Chidambaram ) , प्रफुल्ल पटेल ( Prafulla Patel ), डॉ. विकास महात्मे ( Vikas mahatme ), संजय राऊत ( Sanjay Raut ) आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे ( Vinay sahatrabuddhe ) यांचा कार्यकाळ 4 जुलै 2022 रोजी संपत आहे.
राज्यातून राज्यसभेच्या या सहा जागांसाठी एकूण 7 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. या जागांसाठी 10 जून 2022 ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. 31 मे हा अर्ज करण्याचा अंतिम दिवस असला तरी भाजप ( BJP ) , राष्ट्रवादी ( NCP ) आणि काँग्रेसच्या ( Congress ) उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी कृषी मंत्री अनिल बोन्डे आणि धनंजय महाडिक यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल ( Prafulla Patel ) आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगडी ( Imran Pratpgadhi ) यांनीही आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. तर, शिवसेनेचे संजय राऊत ( Sanjay Raut ) आणि संजय जाधव ( Sanjay Jadhav ) यांनी यापूर्वीच आपले अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान, भाजपने या निवडणुकीत तिसरा उमेदवार दिला आहे. मात्र, काँग्रेसने इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी माजली आहे. अभिनेत्री नगमा ( Actress Nagma ) यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या नाराज आहेत. तर, राज्यसभेसाठी तरुण उमेदवारांना संधी देण्यात यावी असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. मात्र, इम्रान प्रतापगडी यांनी आज अर्ज दाखल केल्यामुळे या सर्व चर्चाना विराम मिळाला आहे.