राज्यातील राजकीय अस्थिरतेमागे भाजपाचा हात आहे का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण तापलं आहे. कोणता पक्ष काय भूमिका घेतो, याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे.
Mahavikas Aaghadi Crisis: राज्यात गेल्या काही दिवसात राजकीय वातावरण तापलं आहे. कोणता पक्ष काय भूमिका घेतो, याकडे राजकीय जाणकारांचं लक्ष लागून आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाबाबत स्पष्ट मत माडलं आहे. राजकीय घडामोडींमागे भाजपाचा हात आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, "अजूनतरी भाजपाचा या घडामोडीत हात असल्याचं दिसत नाही. भाजपाचा मोठा चेहरा तिथे येऊन काय करतोय असं दिसत नाही. ही वस्तूस्थिती आहे."
"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. सरकार टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. मी निधी वाटपात कधीही दुजाभाव केलेला नाही.", असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे, 36 आमदारांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाकडून आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलेला आहे. पक्षांतर बंदी कायद्यामुळे दोन तृतियांश आमदार असणं गरजेचं आहे, आमदार संख्या 36 असल्यास या कायद्यापासून सूट मिळते. त्यामुळे ही संख्या पूर्ण होईपर्यंत गेले दोन दिवस एकनाथ शिंदे गटाने वाट पाहिली.
आता अपेक्षित आमदार संख्या पूर्ण झाल्याने एकनाथ शिंदे गटाकडून सत्तास्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना संपर्क साधण्यात आला आहे.