नागपूर: राज्यात मद्याची दुकाने उघडायला परवानगी द्यावी, या मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेचा भाजपकडूनही विरोध करण्यात आला आहे. कोरोनाचे संक्रमण पूर्णपणे थांबेपर्यंत महाराष्ट्रातील देशी आणि विदेशी मद्याची दुकाने सुरु होता कामा नये, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.  ही दुकाने सुरु झाली तर मद्य विकत घेण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडेल. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होईल. यासोबतच काही सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या घरात पैसे येणे बंद झाले आहे. अशावेळी मद्याची दुकाने उघडायला परवानगी दिल्यास मध्यमवर्गीय घरांमधील पैसा उधळला जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्यविक्रीतून राज्याला मोठ्याप्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे मद्याची दुकाने सुरु झाल्यास राज्य सरकारच्या तिजोरीत काही पैसे जमा होतील. तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यातील मद्याची दुकाने उघडायला परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केली होती. 

मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून राज ठाकरे यांच्या या भूमिकेचा उपरोधिकपणे समाचार घेण्यात आला होता. लॉकडाऊनच्या काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे, पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनाची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत, असा खोचक टोला शिवसेनेकडून राज यांना लगावण्यात आला होता. त्यामुळे सध्या शिवसेना आणि मनसेमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.