कलाक्षेत्राच्या मागण्यांसाठी भाजपचा सांस्कृतिक सेल राज्यपालांच्या भेटीला
भाजपच्या सांस्कृतिक सेलच्यावतीनं निवेदन
मुंबई : कोरोना काळाचा परिणाम इतर क्षेत्राप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रावरही झाला. लॉकडाऊन काळात हजारो कलावंत बेरोजगार झाले. या गोष्टींकडे लक्ष वेधून भाजपच्या सांस्कृतिक सेलच्यावतीनं राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं. मराठी चित्रपटांचे थकीत अनुदान वितरीत करावे, व्यावसायिक नाट्यसंस्था, नाट्य कलावंतांना मदत द्यावी अशा मागण्या यावेळी निवेदनातून करण्यात आल्या.
कोरोनामुळे नियमावली अंतर्गत अर्ध्या आसन क्षमतेने प्रेक्षक नाट्यगृहात बसू शकण्याचा नियम आहेय या पार्श्वभूमीवर नाट्य निर्मात्यांचा आणि पर्यायाने नाट्य कलावंतांचा खर्च निघणेही अवघड झालंय. यामुळे हजारो कलावंतांच्या जीवन जगण्याचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर कोरोना स्थिती पूर्ववत होईपर्यंत संस्थांना आणि कलावंताना अनुदान द्यावे. तसेच नाट्यगृहांचे भाडे अर्धे केले पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
या संदर्भात राज्यातील शासकीय आणि खासगी नाट्यगृह चालकांसाठी सूचनापत्र काढावे,असंही निवेदनात म्हटलंय. इतर मागण्यांमध्ये लोककला आणि कलावंतांची व्याख्या व्यापक करुन त्यांना मदत करावी,वयोवृद्ध कलावंताचे थकीत मानधन त्वरीत वितरीत करावे, आणि यंदाच्या नविन कलावंत निवडीची प्रक्रिया पार पाडावी व मानधन रकमेत वाढ करावी,राज्यनाट्य स्पर्धेच्या धर्तीवर राज्यनृत्य व राज्यचित्र स्पर्धा आयोजित कराव्यात,प्रत्येक जिल्हास्थानी स्वतंत्र सांस्कृतिक विभाग स्थापन करावा,विद्यार्थ्यांना सांस्कृतिक क्षेत्रातील नैपुण्याचे गुणांकन मिळावे
या बाबींचा सकारात्मक विचार करुन त्वरीत निर्णय घेण्यासंदर्भात आपण राज्य सरकारला निर्देश द्यावेत,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सांस्कृतिक सेलचे प्रदेश प्रभारी लक्ष्मण सावजी, संयोजक ॲड शैलेश गोजमगुंडे, सहसंयोजक पंकज चव्हाण, उमेश घनसाळी, अभिनेते योगेश सोमण, लीना भागवत, राहुल वैद्य, संजय भाकरे, कुणाल गडेकर, व्यंकटेश बिदनू उपस्थित होते.