खडसेंना नव्हे तर त्यांच्या मुलीला उमेदवारी देऊ; भाजपची अनपेक्षित खेळी
२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही एकनाथ खडसे यांना दीर्घकाळ मंत्रिपदापासून दूर राहावे लागले होते.
मुंबई: राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास भाजप नेतृत्त्वाने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याची तयारी भाजपने दर्शविली आहे. भाजपच्या या अनपेक्षित डावामुळे खडसे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे.
भाजपकडून मंगळवारी १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. मात्र, यामध्ये एकनाथ खडसे यांच्यासह अनेक विद्यमान मंत्र्यांची नावे नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. २०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही एकनाथ खडसे यांना दीर्घकाळ मंत्रिपदापासून दूर राहावे लागले होते. या सगळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खडसे यांच्यातील संघर्षाची किनार होती. त्यामुळे आता भाजपकडून एकनाथ खडसे यांचे विधानसभेचे तिकीट कापून त्यांना पूर्णपणे बाजूला सारण्यात येणार का, अशी चर्चा सुरु झाली होती.
ही चर्चा आता खरी ठरताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी उमेदवारी यादीत नाव नसूनही काल मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला होता. आपण भाजपशी एकनिष्ठ असल्यामुळे आपल्याला उमेदवारी नक्की मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, ही आशा आता फोल ठरताना दिसत आहे. तेव्हा एकनाथ खडसे बंडखोरी करण्याची शक्यताही भाजप नेतृत्त्वाने लक्षात घेतली आहे.
त्यामुळेच भाजपने रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याचा अनपेक्षित डाव टाकला आहे. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यामुळे आता एकनाथ खडसे भाजपचा प्रस्ताव स्वीकारून रोहिणी खडसे यांच्या पाठिशी ताकद उभी करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.