उद्धव ठाकरे यांनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार आणि भाजपाच्या युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष चेतन पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेस पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षातील लोक विरोधी पक्षात येतात ही राजकारणातील दुर्मिळ नव्हे तर अशक्य गोष्ट आहे असं सांगत भाजपावर टीका केली. तसंच मला लाचारांचा महाराष्ट्र नको आहे असं सांगत जोरदार टीका केली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"सत्ताधारी पक्षातील लोक विरोधी पक्षात येतात ही राजकारणातील दुर्मिळ नव्हे तर अशक्य गोष्ट आहे. ज्याच्याकडे आज काही नाही अशा पक्षात येणं हे हल्लीच्या दिवसात राजकारणात अशक्य असे क्षण आहेत. म्हणून मला अभिमान आणि कौतुक वाटत आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "यासाठी तुम्ही अट्टहास केला होता का? यासाठी तुम्ही पक्ष वाढवत होतात का? दुसऱ्याच्या सतरंज्या उचण्यासाठी पक्ष वाढवला का?  पुण्याचं पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. चंद्रकांत पाटलांची चंपी झाली आहे. अजित पार माझ्याही मंत्रिमंळात होते. त्यांच्या विरोधात तुम्ही रान उठवलं होतं. मोदींनीही त्यांच्यावर आरोप केले होते. पुण्यात भाजपाने चांगली बांधणी केली होती. त्यांचं थोडक्यात शतक हुकलं होतं. पण आता ही सगळी बांधणी ज्या अजितदादांना तुम्ही चक्की पिसण्यासाठी पाठवणार होतात त्यांच्या हाती दिली आहे. यासाठीच बांधणी केली होती का?". 


"आम्ही हिंदुत्तवादी आहोतच. माझ्यावर अनेकजण हिंदुत्व सोडल्याची टीका करतात. शिवसेनेची काँग्रेस झाली असं म्हणतात. 25-30 वर्षं सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली, मग 2 वर्षात काँग्रेस काय होणार? तो काय मिंधे गट आहे का?," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. 


एकनाथ पवारांची संघटक म्हणून नियुक्ती 


संजय राऊत यांनी यावेळी एकनाथ पवार यांची शिवसेनेतील संघटक म्हणून नियुक्ती करत असल्याचं जाहीर केलं. "प्रत्येक मराठी माणूस शिवसैनिक असतो. त्याला योग्य वेळी शिवसेनेत यावंच लागतं. ते योग्य वेळी पक्षात आले आहेत," असं संजय राऊत म्हणाले. 


भाजपाच्या संघटना वाढीत एकनाथ पवार यांच्यासारख्यांचं मोठं योगदान आहे. असा संघटनेतील कार्यकर्ता आज शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना बळकट करण्यासाठी आला आहे. आज शिवसेना सत्तेत नाहीत, याक्षणी देण्यासारखं नाही तरी येत आहात हे महत्त्वाचं आहे. आपल्यावर संघटनेची जबाबदारी भाजपात होती. उद्धव ठाकरेंनी येथेही अशीच जबाबदारी देण्यास सांगितलं आहे. शिवसेनेतील संघटक म्हणून एकनाथ पवार यांची नियुक्ती केली जात आहे. तुमच्या कामाची पद्धत मला माहिती आहे. मराठवाडा, पुण्यात शिवसेनेला बळ मिळेल असं काम तुमच्याकडून अपेक्षित आहे असं संजय राऊत यांनी सांगितलं.