विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून किसन कथोरे मैदानात
नाना पटोले यांना भाजपच्या किसन कथोरे यांचं आव्हान
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. काँग्रेस विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसकडून साकोलीचे आमदार नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणार ते असणार आहेत. तर त्यांना भाजपच्या किसन कथोरे यांचं आव्हान असणार आहे. ज्येष्ठ सदस्य म्हणून भाजपनं कथोरेंना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे आता कथोरे आणि पटोले यांच्या सामना होणार आहे. मात्र महाविकास आघाडीकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे पटोलेंचा विजय निश्चित मानण्यात येतो आहे.
दुसरीकडे चंद्रकांत पाटीला यांनी हिम्मत असेल तर गुप्त मतदान घेऊन दाखवा असं आव्हान दिलं आहे. तर त्याआधी भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे. दुसरीकडे भाजपकडून गुप्त मतदान घेण्याचं आव्हान होत असल्याने आता कोणाला किती मतदान होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे सरकारची आज अग्निपरीक्षा आहे. महाविकासआघाडीचं सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. त्यासाठी आजपासून दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. आजच्या बहुमत चाचणीत महाविकासआघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचं संजय राऊतांचा हवाला देत अजित पवारांनी सांगितलं. तर १६५ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचं भुजबळांनी सांगितलं.
याआधी हॉटेल ग्रँड हयातमध्ये महाविकासआघाडीच्या १६२आमदारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. आता विधानसभेत आज खरंखुरं शक्तिप्रदर्शन होणार असून, सत्ताधारी आमदारांची संख्या १६२ पेक्षा वाढणार का, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.