विधानसभा निवडणुकीआधी भाजपला जड झालं यांचं ओझं
भाजपसमोर जागा वाटपाचं मोठं आव्हान
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात मित्रपक्ष भाजपासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. मित्र पक्षांच्या अवास्तव मागण्या लक्षात घेता मित्रपक्षांचं कोडं भाजपा कसं सोडवणार, यावर भाजपची विधानसभा निवडणुकीतली वाटचाल अवलंबून असणार आहे.
शिवसेनेबरोबर युती कराच असे स्पष्ट आदेश भाजप अध्यक्षांनी दिल्यामुळे भाजपासमोरचा मोठ्ठा प्रश्न आहे. तो २८८ मध्येच मित्रपक्षांसह जागावाटपाचं भागवायचं कसं.
भाजपवर मित्रपक्षाचे ओझे
१. सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची १२ जागांची मागणी
२. रामदास आठवलेंच्या RPI ची १० जागांची मागणी
३. महादेव जानकरांच्या रासपला हव्यात ५७ जागा
४. विनायक मेटेंची शिवसंग्रामसाठी १२ जागांची मागणी
मित्र पक्षांच्या जागांच्या मागणीची बेरीज केली तर हा आकडा ८० पेक्षा जास्त होतो. त्यामुळे मित्रपक्षांची समजूत घालता घालता भाजपची पुरती वाट लागणार आहे.
भाजपाने गेले काही दिवस स्वतंत्रपणे मित्र पक्षांशी चर्चा करायला सुरुवात केली आहे. पडद्यामागून तर शिवसेनेबरोबर जागावाटपाची चर्चा केव्हाच सुरु झाल्याचा भाजपचा दावा आहे. भाजप यावेळेही शिवसेनेबरोबर मित्र पक्षांना शेवटपर्यंत खेळवणार अशी चर्चा रंगते आहे.
जागावाटप कसंही होणार असले तरी भाजप मात्र सर्वात जास्त जागा मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकतं आहे. त्यामुळे सर्वात जास्त जागा जिंकत पुन्हा एकदा शिवसेना आणि मित्रपक्षांवर दबाव टाकणे भाजपाला भविष्यात सोपे जाणार आहे. असं असलं तरी पक्षातच वाढलेली इच्छुकांची गर्दी, इतर पक्षांतलं इनकमिंग आणि मित्रपक्षांची वाढलेली जागेची मागणी याचा समतोल साधता साधता भाजपच्या नाकी नऊ येणार आहेत.