मराठी दिनालाही भाजपनं शिवसेनेला डावललं
मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आखण्यात आलेल्या कार्यक्रमातही शिवसेनेला डावललं गेल्याची खंत पक्षाचे नेते दिवाकर रावते यांनी व्यक्त केलीय.
मुंबई : मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आखण्यात आलेल्या कार्यक्रमातही शिवसेनेला डावललं गेल्याची खंत पक्षाचे नेते दिवाकर रावते यांनी व्यक्त केलीय.
सकाळचा कार्यक्रम आयोजित केला गेला त्याबद्दल धन्यवाद देतो. मात्र शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार वाहण्याच्या वेळी शिवसेनेला स्थान दिले नाही. शिवसेना प्रतिनिधी म्हणून एकनाथ शिंदे यांना बोलवायला पाहिजे होते जे केले गेले नाही, अशी तक्रार रावतेंनी केलीय.
मराठी भाषा दिवस विधिमंडळच्या प्रांगणात साजरा केला गेला. पण या कार्यक्रमाच्या ढिसाळ नियोजनामुळे सरकारची पुन्हा एकदा छी थू झाली. मराठी अभिमान गीताचं सामूहिक गायन ऐन रंगात आलेलं असताना, ध्वनिक्षेपक यंत्रणेत बिघाड झाला. तो शेवटपर्यंत दुरुस्त होऊ शकला नाही.
विरोधकांचा आक्षेप
त्यानंतर विधानसभेत कामकाज सुरू झाल्यावर अजित पवारांनी सरकारनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा खरपूस समाचार घेतला. 'मराठी भाषा गौरव दिनी सुरेश भट यांचे मराठी गीत गायले गेले. हे गीत सात कडव्यांचे आहे. मात्र सरकारने आज जे गीत गाण्यासाठी छापले होते त्यातले शेवटचे कडवे गाळण्यात आले. सात कडव्यांचे गाणे असताना सहा कडवी छापली आणि गायली गेली. हा मराठी भाषेचा आणि सुरेश भट यांचा अपमान आहे', असा संताप पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपचं स्पष्टीकरण
त्यावर भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी 'मूळ अभिमान गीतात सातवं कडवं नाही... जी कविता अभिमान गीत म्हणून गायली जाते, त्यात सातवं कडवं नाही', असं स्पष्टीकरण दिलं.