दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : केंद्रातील भाजपा आघाडीच्या सरकारला चार वर्ष पूर्ण होत असतानाच भाजपाला आता त्यांच्या मित्र पक्षांची आठवण होऊ लागली आहे. त्यामुळेच चार वर्षात मित्र पक्षांची दखल न घेणार्‍या भाजपाने आता मित्र पक्षांना चुचकारायला सुरुवात केली आहे. 


भाजपकडून मित्रपक्षांना गोंजारायला सुरूवात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यासाठी नाराज शिवसेना खासदाराची भाजपा अध्यक्षांनी भेट घेतल्याची चर्चा आहे, तर नाराज तेलगु देसम पक्षाला खूश करण्यासाठी आंध्र प्रदेशला विशेष पॅकेज देणे आदी गोष्टी सुरू झाल्या आहेत. देशातील हवा बदलते आहे याची जाणीव भाजपाला झाल्याची ही लक्षणे आहेत. 


भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ५४३ पैकी तब्बल ३३६ जागा जिंकल्या. यात भाजपाच्याच २८२ जागांचा समावेश आहे.


उत्तर प्रदेशात 80 पैकी 71
मध्य प्रदेशात 29 पैकी 27
गुजरातमध्ये 26 पैकी 26
राजस्थानमध्ये 25 पैकी 25
बिहारमध्ये 40 पैकी 22 


तर महाराष्ट्रात भाजपाने शिवसेनेबरोबर युती करून 48 पैकी 41 जागा मिळवल्या होत्या.. 


मंत्रीमंडळात सहभागी मित्र पक्षांना विचारात घेतलं नाही


मोदी लाटेवर स्वार होत देशातील सर्वच मोठ्या राज्यात भाजपाने कधी नव्हे एवढी चांगली कामगिरी २०१४ लोकसभा निवडणुकीत केली होती. लोकसभेत मोदी लाटेत हे अभूतपूर्व यश मिळाल्यानं भाजपाने सुरुवातीपासून मित्र पक्षांना भाजपाने विशेष किंमत दिली नाही. अगदी मंत्रिमंडळात निर्णय घेतानाही भाजपाने मंत्रीमंडळात सहभागी मित्र पक्षांना विचारात घेतलं नाही. 


गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा घसरलेला आलेख


पण गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाचा घसरलेला आलेख, पैकीच्यापैकी जागा पटकावलेल्या राजस्थानमधील दोन जागांच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर बसलेला फटका, त्याआधी बिहार निवडणुकीत न मिळालेले अपेक्षित यश या सगळ्या पार्श्वभूमीवर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत असलेली मोदी लाट ओसरत असून देशातील हवा बदलत असल्याची जाणीव भाजपाला झाली असावी. कारण तशा हालचाली भाजपानं सुरू केल्या आहेत. 


तेलगू देसमला खूश करण्यासाठी


अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त करणा-या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमला खूश करण्यासाठी मोदी सरकारने आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज दिले आहे. तर स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा करणा-या शिवसेनेलाही चुचकारण्याचा प्रयत्न भाजपाने सुरू केला आहे. 


लोकसभा निवडणुकीत भाजपाबरोबर रहावे यासाठी चर्चा


शिवसेनेला पाण्यात पाहणा-या अमित शहांनीच यासाठी शिवसेना खासदारांची मनधरणी सुरू केल्याची चर्चा आहे. शहांनी शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांना दिल्लीत चर्चेसाठी बोलवून शिवसेनेने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाबरोबर रहावे यासाठी चर्चा केल्याची माहिती आहे. 


भाजपाचा आलेख खाली आला


बिहार, गुजरात, राजस्थानमध्ये भाजपाचा आलेख खाली आला आहे. तिच स्थिती कायम राहण्याची शक्यता गृहित धरली तर गुजरातबरोबरच इतर राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला फटका बसू शकतो. त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जेवढ्या जागा भाजपाने मिळवल्या तेवढ्या मिळवणे भाजपासाठी अवघड आहे. 


 प्रत्येक राज्य भाजपासाठी महत्त्वाचे


2019 साली देशात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी त्यामुळेच प्रत्येक राज्य भाजपासाठी महत्त्वाचे आहे. मागच्या एवढ्या नाही तरी किमान देशात सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 543 पैकी 272 जागा मिळवणे हे भाजपाचे लक्ष्य असणार. त्यासाठीच उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान ही मोठी राज्य भाजपासाठी महत्त्वाची आहेत. 


देशातील बदलणारी राजकीय हवा लक्षात घेता शिवसेनेने स्वबळाची घोषणा केली असली तरी किमान लोकसभा निवडणुकीत युती व्हावी असा भाजपाचा प्रयत्न आहे. तसंचं या निवडणुकीपर्यंत तरी एनडीए कायम रहावे यासाठी भाजपाने मित्र पक्षांच्या अंगाने घेण्याचे ठरवलेले दिसते.