पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीनंतर आता भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'फडणवीसांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील'

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्या दिशेने आहे. गेल्या काही दिवसांत शरद पवार यांनी राज्याच्या अनेक भागांचे दौरे केले आहेत. कालदेखील त्यांनी औरंगाबादमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यानंतर झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनीही उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून तातडीने निर्णय घेणे जास्त गरजेचे असल्याचे म्हटले होते. 


सरकार तीनचाकी असलं तरी एकाच दिशेने चालतंय- उद्धव ठाकरे


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी  माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडूनच दाखवा, असे आव्हान विरोधकांना दिले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी 'तुम्ही इतर वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन दाखवा' असा पलटवार केला. तसेच उद्धव ठाकरे यांची मुलाखत म्हणजे मॅचफिक्सिंग असल्याचे त्यांनी म्हटले. चार महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला मुलाखत दिली आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर उद्धव ठाकरे हे माध्यमांसमोर आले आहे. मुळात संजय राऊत हे ठाकरेंचे स्तुतीपाठक आहे. त्यामुळे हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी इतर माध्यमांना मुलाखत द्यावी, असे आव्हान चंद्रकांत पाटील म्हटले.