मुंबई: राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीनचाकी आहे. पण ही तिन्ही चाकं एकाच दिशेने चालत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी 'सामना' दैनिकाला दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीचा दुसरा भाग रविवारी प्रसिद्ध झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करत असल्याचे स्पष्ट केले. आमचं सरकार तीन चाकांचं असल्याची टीका होते. बरं तीन चाकं तर तीन चाकं. पण ती चालताहेत ना एका दिशेने? महाराष्ट्रात तीन चाकं तर केंद्रात किती चाकं आहेत? मी एनडीएत होतो तेव्हा ३०-३५ चाकांची रेल्वेगाडीच होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
तसेच सरकारी अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांचा वचक राहिला नसल्याच्या आरोपही उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला. अलीकडे अनेकांनी धारावी पॅटर्नचं कौतुक केलं, सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून कौतुक झालं. हे काम नोकरशाहीने सरकराचं न ऐकता केलं आहे का? निर्णय घेण्याचा अधिकार सरकारचा आहे हे मान्य. पण अंमलबजावणी सचिवांकडून करुन घ्यायची असते. शेवटी यंत्रणा राबवण्याची हिंमत तुमच्यात पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ऑर्डरही तुम्ही देणार आणि कामही तुम्हीच करणार, हे गव्हर्नमेंट असू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
याशिवाय, महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याच्या आरोपावरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्र्यांकडून झुकतं माप दिलं जातं, अशी तक्रार होती. पण मध्यंतरी झालेल्या भेटीनंतर तो प्रेमळ गैरसमज दूर झाला आहे. माझा शरद पवार यांच्याशी चांगला संवाद आहेच. पण मी कधीतरी सोनिया गांधी यांनाही फोन करतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.