'फडणवीसांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील'

म्हणूनच ते साखरेचा प्रश्न घेऊन अमित शाह यांच्याकडे गेले असतील

Updated: Jul 26, 2020, 08:33 AM IST
'फडणवीसांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील' title=

मुंबई: साखर कारखान्यांची समस्या घेऊन दिल्लीत केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटायला गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना अमित शाह म्हणजे आदेश बांदेकर वाटले असतील, अशी मिष्किल टिप्पणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजस्थाननंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस राबवण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे सांगितले जात होते. 

सरकार तीनचाकी असलं तरी एकाच दिशेने चालतंय- उद्धव ठाकरे

फडणवीस-शाह यांच्यातील या भेटीविषयी उद्धव ठाकरे यांनी दैनिक 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भाष्य केले. यावेळी संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यामागे काय कारण असू शकते, अशी विचारणा केली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील साखर उद्योजकांचे प्रश्न घेऊन अमित शाह यांना भेटले. ते पूर्ण देशातील साखर कारखानदारांबद्दल चिंता व्यक्त करत असतील. 

त्यावर राऊत यांनी केंद्रीय गृहखात्याकडे साखर कारखानदारांचे काय प्रश्न असू शकतात, अशी शंका उपस्थित केली. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एक मिष्किल टिप्पणी केली. 'गृहा'मध्ये शेवटी साखर लागतेच. फडणवीसांना गृहमंत्री म्हणजे त्यांना कदाचित जसे आदेश बांदेकर करतात कार्यक्रम, तसे गृहमंत्री वाटले असतील. म्हणूनच ते साखरेचा प्रश्न घेऊन अमित शाह यांच्याकडे गेले असतील, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

तसेच देवेंद्र फडवणीस महाराष्ट्रातील सरकार पाडण्याच्या इराद्याने दिल्लीत गेले असले तरी मला त्याची चिंता नसल्याचे उद्धव यांनी म्हटले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकार पाडणार, अशी चर्चा आहे. माझं म्हणणं, वाट कसली बघताय आता पाडा. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडा. मी काय फेविकॉल लावून बसलेलो नाही. तुम्हाला पाडापाडीत, बिघडवण्यात आनंद मिळतो. मात्र, मला त्याची पर्वा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.