मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ  ५ ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामुहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राममंदिराचे भूमिपूजन आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी मोदीजींच्या हस्ते होत आहे. मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा, असे पाटील यांनी सांगितले. 

मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, घरावर कंदिल लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी. घरामध्ये सर्व कुटुंबियांच्या सोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा. मात्र, समारंभाचा सामुहिक उत्सव टाळावा. सामूहिक उत्सव साजरा करणार असू तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. सामूहिक उत्सवामध्येसुद्धा कोरोनाचे भान ठेवावे. ढोलताशे आणि फटाके बिलकूल नकोत, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

'अमित शाह लवकर बरे होवोत'
अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीमुळे मनामध्ये खूप चिंता निर्माण झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईवर अमितभाईंचीही श्रद्धा आहे. आपण अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो की, अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो व ते त्यांच्या कामाच्या नेहेमीच्या झपाट्याने पुन्हा कार्यरत होवोत.