मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'तीनही पक्ष अनैसर्गिक पद्धतीने एकत्र आलेले आहेत, विचारसरणी, विचार, गव्हर्नन्स नाही, केवळ सत्तेला चिकटलेले हे लोक आहेत. ज्या प्रकारे गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटतात तशा प्रकारे सत्तेला चिकटलेले तीन पक्ष आहेत' अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तेचा वाटा जिथे योग्य मिळत नाही, तिथे ओरड होते, पण वाटा मिळाल्यावर सर्व बंडोबा थंडोबा होतात, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 


मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरही देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. याविषयी बोलताना फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. अतिशय दुर्देवी अशी ही घटना आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता कोणती व्यवस्थाच उरलेली नाही. मंत्री, पालकमंत्री, सरकार किंवा मुख्यमंत्री असतील त्यांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं आहे. 


शेतकऱ्यांना दिलासा देणारा एकही निर्णय सरकार घेत नाहीए. आत्महत्या आज इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या घटनेकडे फार गांभीर्याने बघितलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, आणि त्यांच्या कुटुंबाला मदत केली पाहिजे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


विजय वडेट्टीवार यांचं प्रत्युत्तर


दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न हा काल - आजचा नाही. मागच्या सरकारमध्येही आत्महत्या सत्र थांबलेलं नव्हतं. त्या सरकारच्या काळातही अशा अनेक घटना घडल्या. अशा दुर्देवी घटना घटतात, हे कोणत्याही सरकारला भूषणावह नाही. पण आरोप करण्यापेक्षा शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, शेतकऱ्याला कसं उभं करता येईल याचा विचार होण्याची आवश्यकता असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.