`महावितरणकडे पगारासाठी पैसे नसल्याने जादा वीज बिलाचा कट`, भाजपचा आरोप
कोरोना लॉकडाऊनच्या काळात आलेल्या जादा वीज बिलांमुळे राज्यातली जनता त्रस्त आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात आलेल्या जादा वीज बिलांमुळे राज्यातली जनता त्रस्त आहे. त्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जादा वीज बिलांवरून आरोप केले आहेत. 'महावितरणकडे पगार द्यायलाही पैसे नव्हते. ठाकरे सरकारने आम्ही पैसे देणार नाही, असं सांगितलं. तेव्हा मंत्रालयात जादा वीज बिल पाठवण्याचा कट शिजला,' असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
'१५ ते ३० टक्के वाढीव बील देण्याता निर्णय झाला. ६६ हजार रुपयांचं बिल माझ्या शेजाऱ्याला आलं. तक्रार केल्यानंतर दुरुस्ती करून त्यांना शून्य बिल पाठवण्यात आलं. उर्जा विभागाकडून लूट सुरू आहे. उर्जा विभागाने २० हजार कोटींची लूट केली आहे,' असंही सोमय्या म्हणाले आहेत.
जुलै महिन्याचा मीटर रीडिंगला स्थगिती द्यावी, तसंच चुकीची बिलं पाठवली म्हणून राज्य सरकारने माफी मागावी आणि खोटी बिलं पाठवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ४० टक्के मीटर रीडिंग घेतलीच नाहीत, आमच्याकडे अशी १०० वाढीव वीज बिलं आहेत, ही बिलं आम्ही उर्जामंत्र्यांकडे पाठवणार आहोत आणि राज्यपालांनाही भेटणार आहोत, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.