मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiya) यांच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी शिवसैनिकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सोमय्या जखमी झाले होते. आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या याचिकेत डॉ. सोमय्या यांनी त्यांच्यावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा आणि पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे.  खार पोलीस स्थानकात आपल्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत आपण बांद्रा पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यास गेलो होतो. पण पोलिसांनी बनावट एफआयआर दाखल केला, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.


या एफआयआर विरोधात मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार दाखल केली. या बाबत आपण राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्यांची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवावा, असेही  सोमय्या यांनी याचिकेत नमूद केलं आहे. 


किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला
राणा दाम्पत्याला खार पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा हल्ला  शिवसेनेने केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या पोलीस स्टेशनमधून निघाल्यानंतर त्यांच्या गाडीवर बाटल्या, चपला आणि दगडफेक करण्यात आली. त्यांच्या गाडीची काच यामुळे फुटली. ज्यामध्ये सोमय्या हे जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.  मात्र, सोमय्यांना झालेली जखमी कृत्रिम आहे का, याची चौकशी पोलीस करणार आहेत.