मुंबई : INS विक्रांत कथित घोटाळाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची आज सलग तिसऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. सलग चार दिवस म्हणजे गुरुवारपर्यंत सोमय्या यांची चौकशी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजची चौकशी झाल्यानंतर माध्यमांसमोर बोलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आम्ही कसलाच घोटाळा केला नाही, त्यामुळे आम्हाला कसलीच भीती नाही, पण परवापासून एक एक अंक उघडणार आहे असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


उद्धव ठाकरे यांनी कितीही खटाटोप केले, किरीट सोमय्याला जेलेमध्ये टाकणार, मेधा सोमय्याला जेलमध्ये टाकणार, नील सोमय्याला जेलमध्ये टाकणार असं बोलत असले तरी किरीट सोमय्या घाबरणार नाही, माझ्या नव्वद वर्षांच्या आईविरुद्धही एफआयआर केला तरी मी झुकणार नाही असं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. 


उदध्व ठाकरे सरकारने माझी तीन दिवस चौकशी करावी किंवा तेरा दिवस करावी, पण ठाकरे सरकारच्या घोटाळ्याचं तेरावं मी घालणार असा  इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. 


INS विक्रांत कथित मदतनिधी घोटाळ्याप्रकरणी नील सोमय्या यांना कोर्टाने दिलासा दिला आहे, तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. 25 ते 28 एप्रिलदरम्यान चौकशीला हजर राहण्याचे निर्देश देतानाच चौकशीला हजर राहून तपासात सहकार्य करावं असं कोर्टाने नील सोमय्या यांना सांगितलं आहे, यावर किरीट सोमय्या यांनी न्यायालायचे आभार मानले.



फोन टॅपिंग प्रकरणी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना किरीट सोमय्यांनी टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे तेच उद्योग आहेत अडचणीत आलं की विषय भरकटवायचे, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.