मुंबई : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीयांचं वास्तव्य आहे. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात अनेक उत्तर भारतीयांचा समावेश आहे. उत्तर भारतीयांच्या महाराष्ट्रातील नोकऱ्यांच्या मुद्दयावर अनेकवेळा वादही निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच मुद्द्यावरुन उत्तर भारतीयांना अनेकवेळा टार्गेट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठी आणि उत्तर भारतीय वाद महाराष्ट्रासाठी नवीन नसतानाच आता महाराष्ट्रातले भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या एका मागणीने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये मराठी भाषेला पर्यायी भाषेचा दर्जा देण्याची विनंती केली आहे. 


उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना चांगलं मराठी बोलता आल्यास महाराष्ट्रात त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळण्यास मदत होऊ शकते, असं कृपाशंकर सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. यासाठी उत्तर प्रदेशातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याची मागणी त्यांनी केली आहे. 


महाराष्ट्रात या पत्रामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसेने आधीपासूनच महाराष्ट्रात परप्रांतियांना विरोध केला आहे. आता कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या मागणीवर मनसेने टीका केली आहे. यूपीतच रोजगार निर्माण करा असा सल्ला मनसेने दिला आहे.


विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तत्त्वतः कृपाशंकर सिंह यांच्या मागणीला सहमती दर्शवली आहे. योगी आदित्यनाथ वाराणसीमध्ये प्रायोगिक तत्वावर मराठी भाषा शिकवण्याचा विचारात आहेत.