Pankaja Munde Corona Positive : पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण
कोरोनाबाधित कुटुंबियांच्या संपर्कात आल्या होत्या पंकजा मुंडे
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत पंकजा मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. (BJP Leader Pankaja Munde Tested Corona Positive ) काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित कुटुंबियांच्या सांत्वनासाठी गेलेल्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
तसेच पंकजा मुंडे यांची बहिण आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. आता पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
काय म्हटलंय ट्विटमध्ये?
माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.
पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या अंगरक्षक भावाला कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं गमावलं. गोविंद मुंडे असं त्यांचं नाव. खुद्द पंकजा मुंडे यांनी गोविंद यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत ही माहिती दिली होती. पंकजा मुंडे यांनी गोविंद यांना बरं वाटावं म्हणून प्रार्थना करण्याचं आवाहन कलं होतं. पण, गोविंद मुंडे यांचं कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली. पंकजा मुंडे यांनी गोविंद मुंडे यांच्या निधनाची माहिती देणारं ट्विट केलं होतं. आता त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून गोविंद यांच्या आठवणी जागवल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली होती.