मुंबई: एकीकडे भाजप - शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवेश करुन घेत असतानाच आज भाजपलाच राष्ट्रवादीने जोरदार धक्का दिला. भाजपाचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री रमेश बंग, नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजू राऊत, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे उपस्थित होते. विजय घोटमारे यांनी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. यानंतर भाजप आणि शिवसेनेकडून नेत्यांची घाऊक आयात सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम केला होता. 


यामध्ये जगजितसिंह राणा, सचिन अहिर, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, मधुकर पिचड, अवधुत तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यासारख्या बड्या नेत्यांनी शिवसेना आणि भाजपचा रस्ता धरला होता. यापैकी मधुकर पिचड आणि भास्कर जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तर साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही आज अमित शहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. 


राष्ट्रवादीला एकापाठोपाठ एक हादरे बसत असल्याने आता शरद पवार स्वत: मैदानात उतरणार आहेत. पवार हे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार असून सोलापुरातून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांत बैठका घेऊन नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.