BJP MLA Ganpat Gaikwad Shooting : उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वादातून हा प्रकार घडला असला तरी गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी आता खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांना जामिनावर बाहेर काढण्यात आलं आहे. मी नावे देऊ शकतो. चार गुंड टोळ्यांच्या प्रमुखांना जामीनावर बाहेर काढण्यात आलं हे फक्त राजकारणासाठी. त्यातून एका गुंडाचा खून झाला. मुंबई महाराष्ट्रामध्ये गुडांच्या हाती कायदा दिल्या आहेत. महेश गायकवाड कोण आहेत हे मला माहिती नाही. पण हे प्रकरण धक्कादायक आहे. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही हे फक्त महाविकास आघाडीच्या बाबतीतच आहे का?" असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.


"एका आमदाराने गोळीबार करुन सुद्धा मुख्यमंत्र्यांचे निवेदन नाही. गृहमंत्र्यांची भूमिका स्पष्ट नाही. अजित पवार म्हणतात गृहमंत्र्यांशी चर्चा करेन. हे फक्त चर्चा करण्याइतके सौम्य आहे का? पोलीस आमच्या कार्यकर्त्यांच्या दारात येतात आणि तडीपार करतात. तुमच्या जिल्ह्यात माफियांचे राज्य चालू आहे. नागपूर, ठाणे, मुंबई, पुण्यात निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारांना बाहेर काढून त्यांना राजकीय विरोधकांवर सोडलेलं आहे. हे चित्र अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना आजच्या प्रकारानंतर तोंड आहे का? गणपत गायकवाड यांचे निवेदन सामान्य माणसाने समजून घेतलं पाहिजे की, मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गोळीबार केला. ते गु्न्हेगारांना पाठीशी घालत आहेत, हे त्या आमदाराचे निवेदन आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पिलावळ यांनी याप्रकरणावर बोलाव. या सगळ्यामागे राजकारण, खोके आणि पेट्या आहेत. याचा हिशोब वर्षा बंगल्यावरुन केला जातो," असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.


"भाजपाच्या आमदाराने एका त्राग्याने गोळीबार करुन हे निवेदन दिलं आहे. महाराष्ट्र इतक्या रसातळा कधीच गेला नव्हता. आज महाराष्ट्रामध्ये पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गोळीबार झाला आहे. देवेंद्र फडणवीस आपण वकील आहात, राम तुमच्या बाजूने आहे. तुमचं राज्य कायद्याचे आहे का? गोळीबार करणाऱ्या आमदाराला अटकपूर्व जामीन देतील. पुण्यामध्ये तीन भयंकर गुन्हेगारांना सोडण्यासाठी सरकारमधल्या तीन मंत्र्यांनी हस्तक्षेप केला हे मी लवकरच सांगेन. पण राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांना अटकपूर्व जामीन नाही. गणपत गायकवाड यांच्यासाठी गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून आता फोन जाईल," असे संजय राऊत म्हणाले.