मुंबई: राज्य सरकारवर टीका करताना भाजपचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याबद्दल बोलताना चुकीचं विधान केलं. नीतेश राणेंनी आलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ट्विट करून खुलासा केला आहे. नीतेश राणे यांनी आज ट्वीट करून आपले शब्द मागे घेतले आहेत.


काय आहे संपूर्ण प्रकरण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीतेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार राडा केला.  त्यानंतर नितेश राणे यांच्याकडून ‘भावना दुखावल्या असल्यास शब्द मागे घेतो’ असं ट्विट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 राडेबाज आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. 


अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रति विधानसभा भरवली होती. यामध्ये भाग घेताना अनेक आमदारांनी सरकारवर टीका केली. शिवसेना व मुख्यमंत्र्यांना सातत्यानं लक्ष्य करणाऱ्या नीतेश राणे यांनाही प्रति विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी नीतेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी बोलताना नीतेश राणेंचा तोल गेला. 


काय म्हणाले नीतेश राणे?


आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे आज तीव्र पडसाद उमटले. मुंबईत शिवसैनिकांनी रस्त्यावर येत नीतेश राणे यांचा पुतळा जाळला व माफीची मागणी केली. भविष्यात तोंड सांभाळून बोलावं, असा इशाराही दिला.



नीतेश राणे यांचं ट्विट 


हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन नीतेश राणे यांनी ट्वीट करत आपले शब्द मागे घेतले आहेत. 'विधान भवनाबाहेर काल भाषण करताना आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मी जे बोललो, त्याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. माझ्या वक्तव्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो. वैयक्तिक टीका करण्याचा माझा हेतू नव्हता, असं नीतेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.