सासरे सभापती-जावई विधानसभा अध्यक्ष? भाजपकडून आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी
भाजपची आणखी एक खेळी, शिवसेनेतून आलेल्या नवख्या आमदाराला तिकीट
Vidhansabha Election : महाराष्ट्राचे विसावे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शपथ घेतली आणि गेले 10 दिवस सुरु असलेल्या सत्तासंघर्ष नाट्यावर पडदा पडला. देवेंद्र फडणवीस (Devenda Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं वाटत असतानाच भाजपने मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
आता भाजपने आणखी एक खेळी केली आहे. 3 आणि 4 जुलैला विशेष अधिवेशन होणार असून शिंदे सरकारला बहुमत चाचणी पास करावी लागणार आहे. पण त्याआधी विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे.
नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं. या जागेसाठी भाजपने कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना उमेदवारी दिली आहे. राहुल नार्वेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यास सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष होण्याचा मान राहुल नार्वेकर यांना मिळणार आहे. पक्षात अनेक अनुभवी आणि दिग्गज आमदार असताना नवख्या आमदाराला तिकीट दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विरोधी पक्षाकडून या जागेसाठी अद्याप कुणीही उमेदवार अर्ज भरलेला नाही.
आणखी एक योगायोगा म्हणजे राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यास राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं सर्वोच्च पद हे एकाच कुटुंबात जाण्यचा दुर्मिळ योग जुळून येणार आहे. राहुल नार्वेकर यांचे सासरे रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) हे विधान परिषदेचे सभापती आहेत.
आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय
शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर एकेकाळी शिवसेनेत असलेले राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदी उमेदवारी देण्यात आली आहे. राहुल नार्वेकर हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. पण लोकसभा निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये पहिल्यांदाच ते कुलाबा मतदारसंघातून विधानसभा आमदार झाले.
राहुल नार्वेकर यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. तर भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत. राहुल यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.