मुंबई : कोरोनाच्या काळात खाजगी लॅबधारकांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांची लूट करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. खाजगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने जनतेच्या खिशातून सुमारे २७० कोटी रुपयांची लूट केली आहे. या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने RT-PCR चाचणीचे दर कमी करून १२०० रुपयांपर्यंत खाली आणल्याबाबत स्वतःचे अभिनंदन करून घेतले. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. हिंदुस्तान लेटेक्स लि. अर्थातच एच.एल.एल. लाइफकेअर ही भारत सरकारची कंपनी आहे. या कंपनीने राज्य शासनाला १९ ऑगस्ट रोजी एक पत्र दिले. या पत्रात RT-PCR चाचणी ७९६ रुपयांत करण्याबाबत अवगत करून, त्यांना सेवेची संधी देण्याबाबत विनंती केली. शासनाने जनतेच्या हिताचा विचार करून तात्काळ त्यांना RT-PCR चाचणी ७९६ रु. मध्ये करण्याबाबत पावले उचलायला हवी होती. परंतु, राज्य शासनाने या प्रस्तावावर कोणताही विचार न करता, हा प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला', असा आरोप दरेकर यांनी केला. 


'१९ ऑगस्ट २०२० ते ७ सप्टेंबर २०२० या २० दिवसांमध्ये प्रती ग्राहक १२५६ रुपये RT-PCR चाचणीकरिता अधिक मोजावे लागले. सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाने ५० लाखापर्यंत चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी १९,३४,०९६ चाचण्या खाजगी लॅबव्दारे झाल्या आहेत. याचाच अर्थ या खाजगी लॅबनी शासनाशी संगनमत करुन २४२ कोटी ९२ लाख रुपये गोरगरीब जनतेकडून वसूल केले', असा दावा दरेकर यांनी केला आहे.


ॲण्टीबॉडी टेस्टमध्येही लूट 


'७ जुलै २०२० ला देखील एच.एल.एल. लाईफकेअर या कंपनीने खाजगी लॅबधारकांच्या दरापेक्षा एक हजार रुपये कमी दराने, तर ॲण्टीबॉडी टेस्ट २९१ रुपयांना करण्याबाबत सरकारी कंपनीने संमती दर्शविलेली असताना, राज्य सरकारने खाजगी लॅब धारकांना ५९९ रुपये घेण्याची परवानगी दिली. म्हणजेच ॲण्टीबॉडी टेस्टमध्येही ३०० रुपये प्रति टेस्ट अधिक दराने लूट सुरु आहे. आतापर्यंत चाचण्या विचार करता जनतेची २७ कोटी रुपयांनी लूट झाली', असं दरेकर म्हणाले. 


आरोग्य विभागाच्या संगनमताने झालेल्या या लूटीची चौकशी करावी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही या गंभीर प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं.