मुंबई : राज्यात युती इतकी भक्कम आहे की सौम्य काय किंवा तीव्र धक्के बसले तरी काहीही फरक पडणार नाही. काही तडे गेले असतील ते भरुन निघतील. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचे काय म्हणणे आहे, ते तुम्ही छापा. युतीचे वैशिष्ट्ये असे आहे, की एखाद्या कुठल्याही  दिवशी अचानक युतीची घोषणा होईल, असे व्यक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे भाजप युतीसाठी आजही आग्रही असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी युतीबाबत भाष्य करताना म्हटले होते. युतीच्या वावड्या उठत आहेत. युती होणे शक्य नाही. आमच्यापर्यंत युतीची बोलणी करण्यास आलेले नाही. युतीबाबत बोलणी कोण करणार याचा आम्ही शोध घेत आहोत. त्यामुळे युतीचे वृत्त निराधार आहे, असे राऊत यांनी म्हटले होते. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी युती होणार हे निश्चित असून राऊत यांना टोला लगावला.


'कितीही धक्के बसू देत, फरक पडत नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आणि शिवसेना युती भक्कम आहे. कितीही धक्के बसले तरी काहीही फरक पडत नाही. युतीचे वैशिष्ट्ये असे आहे की एखाद्या कुठल्याही दिवशी अचानक युतीची घोषणा होईल. काही पक्षांच्या निवडणुकीसाठी ५ वर्षांनंतर बैठका होतात. मात्र, शिवसेना आणि भाजपच्या बैठका रोजच होत असतात, असे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता चिमटा काढला. त्याचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्र होणार नाहीत तर त्या वेगवेगळ्या होणार आहेत, असे ते म्हणालेत.


दुष्काळाबाबत तातडीची बैठक


दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळाबाबत बैठक घेतली. या बैठकीत सर्व विषय मार्गी लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्याच्या योजना यांचे दुरुस्ती प्रस्ताव मान्य, पाणीपुरवठा वीज थकबाकी विषय संपवला, काही तात्पुरते पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे,  सध्या १००० टँकर महाराष्ट्रात सुरू आहेत. तसेच ३५ हजार हेक्टरवर (एक लाख एकर) चारा लागवड झाली आहे. राज्यात दुष्काळ भागात मंडल स्तरावर चारा छावण्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.


गुरे विकली जात आहेत, अशी काही भीषण स्थिती नाही. आज २९०० कोटी रुपये दुष्काळग्रस्तांसाठी मदत निधी राज्य सरकारने दिली आहे. जिल्हाधिकारी त्यांच्या स्तरावर मार्गी लावतील. केंद्राची मदत येईल तेव्हा तेव्हा येईल, आम्ही मदत वाटप सुरू केले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत.


'नोकरीत आरक्षण मिळणार'


दरम्यान, राज्यातल्या मेगा भरतीमध्ये केंद्राच्या नियमाप्रमाणे १० टक्के सवर्णांना आरक्षण मिळणार आहे. त्याचप्रमाणे मेगा भरतीमध्ये राज्यातील मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.