भाजपचं `मिशन लोकसभा 2024` भाजपच्या टार्गेटवर शिवसेनेचे `16`
राज्यात शिवसेनेला धोबीपछाड देण्याची भाजपची रणनीती
सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई : भाजपनं 2022 मध्येच 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. मात्र यासाठी महाराष्ट्रात भाजपनं वेगळी रणनीती आखलीय. राज्यात भाजप स्वबळावर सर्व लोकसभेच्या जागा लढवणार असलं तरी राज्यातल्या 16 मतदारसंघांवर विशेष लक्ष देण्याची योजना भाजपनं आखलीय.
16 मतदारसंघावर विशेष लक्ष
दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई तसंच ठाणे, कल्याण हे मुंबई महानगर क्षेत्रातले मतदारसंघ, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील औरंगाबाद, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी, विदर्भातील अमरावती, वाशिम, उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, इचलकरंजी हे मतदारसंघ भाजपच्या रडारवर आहेत.
गेल्या 25 वर्षांपासून दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुका एकत्र लढत होते. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपची ताकद कमी राहिली. मात्र आता अशा जागांसाठी भाजपनं खास रणनीती आखलीये.
भाजपाची खास रणनीती
- प्रत्येक मतदारसंघात बूथ कमिटी नेमली जाणार
- केंद्र सरकारच्या योजना आणि कामं लोकांपर्यंत पोहोचवली जाणार
- महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार मतदारांपर्यंत पोहचवणार
- त्यासाठी 16 मतदारसंघांची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवणार
महाराष्ट्रातील या 16 मतदारसंघांसह देशातील 113 लोकसभा मतदारसंघांकडे खास लक्ष देण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. अजून निवडणुकीला 2 वर्षं बाकी असतानाच राज्यात भाजपनं शिवसेनेला धोबीपछाड देण्याची रणनीती आखलीय. मात्र याला किती यश येणार हे निकालात स्पष्ट होईल.