संजय राऊतांच्या राज्यपाल भेटीतल्या फोटोवर भाजपचा निशाणा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली.
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारींना वाकून नमस्कार केला. संजय राऊत यांचा हा फोटो सोशल मीडियावर काही मिनिटांमध्येच व्हायरल व्हायला सुरूवात झाली. संजय राऊत यांच्या या फोटोवर भाजपने निशाणा साधला आहे.
धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब 'सामना' हो गया, असं ट्विट भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे. या ट्विटसोबतच भाजपने संजय राऊत यांचा नमस्कार करत असल्याचा फोटोही शेयर केला आहे.
दुसरीकडे संजय राऊत यांनी राज्यपालांना नमस्कार का केला? याच उत्तर दिलं आहे. भगतसिंग कोश्यारी हे माझ्यापेक्षा मोठे असल्यामुळे त्यांना नमस्कार केला. आमच्या दोघांमध्ये चांगली चर्चा झाली. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार चांगलं चालतंय, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, असं राज्यपालांना सांगितल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यपालांवर बोचरी टीका केली होती. राऊत यांच्या या टीकेमुळे राज्यपाल चांगलेच नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन या कटुतेला तिलांजली दिल्याचे सांगितले जातंय.
राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही कोणताही दुरावा नसल्याचे राऊत यांनी या भेटीनंतर स्पष्ट केले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचेही मधूर संबंध आहेत. दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाही. आमच्यात दऱ्या वैगैरे वाढत नाही. ते पालक असून घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे सर्वांना प्रियच असतात. पण विरोधक जेव्हा राजकारण करतात तेव्हा आम्ही भाष्य करत असतो, असे राऊत यांनी सांगितले.