मुंबई: 'शिवसेना भाजप एकत्र लढली तर, काँग्रेस औषधालाही शिल्लक राहणार नाही. आम्ही शेवटपर्यंत युतीसाठी प्रयत्न करणार आहोत', अशी भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तर, 'मागासवर्ग आयोगाचा अहवाल दिल्यानंतरच आरक्षणाचा विषय संपणार असून, मागासवर्ग आयोग जसा अहवाल देईल तो स्वीकारला जाईल', असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणाबाबत होत असलेल्या विलंबाबद्धल न्यायालयाने सरकारला विचारलं होतं. तसंच मागासवर्ग आयोगालाही अहवाल देण्यास उशीर का होत आहे याचीही न्यायालयाने विचारणा केली होती. या पार्श्वभूमिवर चंद्रकांत पाटील बोलत होते.


शिवसेना, भाजप सत्तेसाठी खणाखणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, सत्तेत आल्यापासून शिवसेना भाजपमध्ये खणाखणी सुरू आहे. सत्तेचा पुरेपूर वापर करत भाजप शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर, सत्तेच्या घरात राहून वर्मावर बोट ठेवत शिवसेना भाजपचे वाभाडे दररोज काढत आहे. तसेच, शिवसेनेचे मुखपत्र सामनातूनही जोरदार 'सामना' रंगत असून, भाजपवर शाब्दिक बाण मारण्याची एकही संधी शिवसेना सोडत नाही.


यूतीसाठी भाजप घोड्यावर


अत्यंत पद्धतशीरपणे आखणी करत भाजपने शिवसेनेसोबतची युती २०१४मध्ये तोडली. त्याचा पुरेपूर फायदा घेत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची कामगिरीही केली. पण, आता देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण कमालिचे बदलत आहे. त्यामुळे येत्या काळात (२०१९) सत्ता मिळवायची तर, एकटे लढून चालणार नाही. त्यासाठी शिवसेनेसारख्या समविचारी आणि तितक्याच तगड्या पक्षाची गरज असल्याचे भाजपच्या ध्यानात आले आहे. त्यामुळे यूतीसाठी भाजप घोड्यावर बसला आहे. पण, शिवसेनेने आगोदरच स्वबळाची घोषणा केल्याने ही युती होणार का, याबाबत राज्यालाच नव्हे तर, देशातील राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे.